विज्ञान केंद्र - मुक्त प्रकल्प


मुख्यपान     मुक्त प्रकल्प     लेखमाला     उपक्रम     संपर्क    


मुक्त प्रकल्प म्हणजे काय ?

मुक्त प्रकल्प हा विज्ञान केंद्राचा कणा आहे. केंद्राचे सदस्य स्वतः प्रयोग करतात आणि त्यातील यशस्वी प्रयोगांचे रूपांतर उत्पादनांत करण्यासाठी प्रकल्प हाती घेतला जातो. मुक्त प्रकल्पांची कल्पना मुक्त संगणक प्रणालीच्या (Free Software) धर्तीवर साकारली आहे.

  • वापरण्याचे स्वातंत्र्यः मुक्त प्रकल्प कोणतीही व्यक्ती कोणत्याही कारणासाठी वापरू शकते.
  • अभ्यास करण्याचे स्वातंत्र्यः मुक्त प्रकल्पाबरोबर त्या प्रकल्पाचा सर्व अंतर्गत तपशील खुला केला जातो. उदा. त्यातील आकृती, असल्यास संगणक प्रणाली, वापरलेली अवजारे, साहित्य यादी इ. त्यामुळे या प्रकल्पाचा अभ्यास कोणालाही करता येतो.
  • वितरणाचे स्वातंत्र्यः मुक्त प्रकल्प कोणतीही व्यक्ती इतरांना वितरित करू (मोफत किंवा विकतही) शकते. मात्र तसे करताना हा प्रकल्प मुक्त ठेवलाच पाहिजे.
  • बदल व सुधारणा करण्याचे स्वातंत्र्यः मुक्त प्रकल्पात बदल करून सुधारणा करण्यास कोणत्याही व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. मात्र वितरण करताना तो याच मुक्त परवान्याखाली वितरित करावा लागेल.

वरील चार स्वातंत्र्ये अनुभवत वापर, सुधारणा-बदल किंवा वितरण करताना कोणत्याही व्यक्तीवर कसलेही आर्थिक बंधन असत नाही.

विज्ञान केंद्र प्रकल्प मुक्त का ठेवते ?

  1. कृतीतून प्रबोधनः विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मुक्त प्रसार करून प्रबोधन करणे हे विज्ञान केंद्राचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.
  2. शैक्षणिक गरजः महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी स्वतः प्रकल्प करून अनुभव मिळवावा या साठी त्यांना त्या प्रकल्पाचा अंतर्गत पूर्ण तपशील गरजेचा असतो. ही गरज प्रकल्प मुक्त असण्याने पूर्ण होते.
  3. आत्मविश्वासः शिक्षणक्रम संपताना, असा प्रकल्प केल्याने जगाच्या उपयोगी पडून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता विद्यार्थ्यांमधे निर्माण होते.
  4. स्थानिकीकरणः कोठलाही आडपडदा (पैसा किंवा ज्ञान यांचा) न ठेवता, तंत्रज्ञानाचा मुक्त प्रसार खेडोपाडी झाला तर स्थानिक पातळीवर अनेक वस्तू सेवा निर्माण होतील आणि “बाहेरून” काही आणावेच लागणार नाही. वाहतुकीचा खर्च वाचेल, प्रदूषण नियंत्रित होईल.

पर्यावरण आणि आम्ही

पर्यावरण आणि विज्ञान-तंत्रज्ञान एकमेकांच्या विरोधात नाहीत. मात्र आर्थिक हावरटपणामुळे विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाला हानी पोचवली जाते हे सत्य आहे. मानवी गरज (हाव नव्हे) आणि तंत्रज्ञान यांचा समतोल राखण्यासाठी समुचित तंत्रज्ञानाचा (Appropriate Technology) मार्ग विज्ञान केंद्राने स्वीकारला आहे.

सहभागासाठी आवाहन

हे काम एकट्या दुकट्याचे नाही. अधिकाधिक सुजाण व्यक्ती यात सहभागी झाल्या की मार्ग सुकर होईल हे मात्र नक्की. अशा प्रकल्पात रस असणाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करीत आहोत. तुमच्या सहभाग असा असू शकतोः

  • आर्थिक सहभागः प्रकल्पासाठी लागणारे आर्थिक बळ उभारण्यासाठी विज्ञान केंद्राचे स्वतःचे मॉडेल आहे. तुम्ही असा सहभाग घेऊ इच्छित असाल तर आमच्याशी संपर्क साधा.
  • ज्ञान सहभागः तुमच्या विशेष ज्ञानाचा वापर करून एखादा मुक्त प्रकल्प पुढे जाईल असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे स्वागत आहे.
  • कौशल्य सहभागः तुमचे विशेष कौशल्य वापरून एखादा मुक्त प्रकल्प पुढे जाऊ शकतो. उदा. सोल्डरिंग, वेल्डिंग, आरेखन इ.
  • वितरण व प्रसारः व्यवहारात वापरण्यायोग्य प्रकल्पांचे वितरण व प्रसार करून तुम्ही अशा प्रकल्पात सहभागी होऊ शकता.

या प्रकल्पांचा वापर करा !

या ठिकाणी विज्ञान केंद्राचे काही मुक्त प्रकल्प सादर केले आहेत. त्यांचा वापर तुम्ही करू शकता. त्याशिवाय काही चालू महत्वाकांक्षी प्रकल्प पुढील प्रमाणे आहेतः

  1. शुद्ध ऊर्जाः पर्यावरणाची किमान हानी करून १०० वॉट ऊर्जा निर्माण करणे.
  2. घर तेथे भाजी बागः कितीही लहान वा मोठे घर असेल तरी तेथे घरची भाजी मिळावी या साठी तंत्र विकसित करणे.
  3. पुस्तक प्रकल्पः मराठीतून सर्वांना समजेल अशा भाषेत रोजच्या जीवनातील विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख करून देणारी पुस्तके प्रकाशित करणे.

वरील पैकी कोणत्याही मुद्द्यासंबंधी संवाद साधण्यासाठी आमच्याशी या ठिकाणी संपर्क साधा. धन्यवाद.


Author: विज्ञानदूत

Created: 2021-02-12 Fri 10:54