विज्ञान केंद्र - लेखमाला


वेगळी वेबसाइट

एका वेगळ्या वेबसाइटची ही ओळख आहे. सारे जग बलाढ्य जागतिक कंपन्यांनी बनवलेल्या जादूसमान वाटणाऱ्या उत्पादनांनी झपाटले गेले असताना, हा एकांडा शिलेदार आपल्या अत्यंत साध्या दिसणाऱ्या पण प्रभावी प्रकल्प सादर करणाऱ्या वेबसाइटवर आपल्या साऱ्यांना एक इशारा देत आहे. …

विज्ञान केंद्राने या प्रकल्पकाराशी संपर्क साधला तेव्हा या प्रकल्पांना अधिक लोकांसमोर आणण्याला त्यांनी परवानगी दिली, पण स्वतःला अनामिक ठेवण्याच्या अटीवर. काम महत्वाचे, त्याच्या मागचे नाव नव्हे ही (सध्याच्या युगात न शोभणारी) भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या वेबसाइटवरील काही मजकुराचे हे भाषांतरः-

मी हे का करतो

पूर्वी मी प्रोग्रामिंग करत असे. मला त्यात आनंदही मिळायचा. आजही थोड्या प्रमाणात मला तो मिळतो. एकेक प्रोग्राम म्हणजे एक स्वतंत्र विश्वच असते. हे विश्व-निर्मितीचे काम फार आकर्षक असते. पण जो जो मी प्रोग्रामिंग करत राहिलो तो तो माझ्या हे ध्यानात येत गेले की सॉफ्टवेअर हे अखेरीला (ते ज्याच्यावर चालते त्या) हार्डवेअरवर अवलंबून असते. हे हार्डवेअर सतत बदलत राहिले आहे. प्रोग्राम हा काही एखाद्या पुस्तकासारखा किंवा चित्रासारखा नसतो. त्याला त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी, सतत हार्डवेअरशी मिळते जुळते घेत, बदलावे लागते.

पहिल्यांदा त्या निमित्ताने मी हार्डवेअर विषयी शिकत राहिलो, पण मग लक्षात आले की याला अंत नाही. असे हार्डवेअर कधीच मिळणार नाही की जे चिरस्थायी असेल. याचा दुसरा अर्थ मी असा काढला की चिरकाल टिकेल असे काम संगणकावर करणे शक्य नाही. कारण हार्डवेअरची निर्मिती ही वापरणाऱ्याच्या नियंत्रणात नसते. म्हणजेच, संगणकावरच्या प्रोग्राम मधील जग हे शेवटी वाळूच्या भुसभुशीत पायावरच उभारलेले असणार.

या वळणावर मी प्रोग्रामिंग पूर्णपणे सोडून दिले. एखादे जास्त अर्थपूर्ण काम शोधत राहिलो. पण या अडचणीने माझ्या पिच्छा सोडला नाही. माझे काम चिरस्थायी होण्यासाठीचा मुख्य अडथळा म्हणजे तंत्रज्ञान नावाचा सावळा गोंधळ (chaos of technology) हाच राहिला.

मूळ घटकांऐवजी ब्रँडच ओळखला जात होता. काही खास यंत्रणांचा वापर म्हणजेच वस्तू बनवण्याचे तंत्र असे म्हटले जात होते, आणि कारागिरी नष्ट होऊन, उत्पादन ही केवळ कोणत्यातरी (बड्या कंपन्यांनी बनवलेल्या) अवजाराची किमया होत चालली.. हे सारे ठिकाणावर यायलाच हवे असे माझ्या मनाने घेतले.. ते मी करायला घेतले.

वरील शेरे थोडे अधिक समजून घ्यावे लागतील. वनस्पती तुपाला डालडा म्हणणे किंवा संगणकावरील स्प्रेडशीटला एक्सेल म्हणणे ही मूळ घटकांऐवजी ब्रॅंडच ओळखला जाण्याची उदाहरणे आहेत. छायाचित्रणाची दृष्टी नसताना केवळ काही मेगा पिक्सेलचा कॅमेरा जवळ बाळगला की छायाचित्रकार होता येते हा भ्रम निर्माण होतो. कारागिरी नष्ट होण्याचे हे उदाहरण. हे सारे बदलायला हवे असे हा लेखक म्हणतो आहे.

या ठिकाणी सादर केलेल्या कामामागची भूमिका कोणालाही समजण्यायोग्य, चिरस्थायी तंत्रज्ञान निर्माण करण्याची आहे. हे प्रकल्प एका व्यक्तीला घडवता येतील.

हे कसे करता येते ?

अजस्त्र आणि किचकट तंत्रज्ञानात अडकून न बसणारे पाच घटक आहेत. कोणताही कारागीर या पाच घटकांवर आधारित उत्पादन करून ते चिरस्थायी बनवू शकतो. ते घटक आहेत-

  • माती
  • नैसर्गिक धागा
  • लाकूड
  • धातु
  • काच

काही निवडक प्रकल्प

वस्तू चिरस्थायी करण्यासाठी आणि कारागिरीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हे प्रकल्प आहेत. या वेबसाइटवर सुमारे सव्वाशे प्रकल्प तपशिलवार सादर केले आहेत. रसायने, वर उल्लेख केलेले मूळ घटक आणि कारागिरी यांच्या सुयोग्य वापराने हे प्रकल्प कोणालाही पूर्णत्वाला नेता येतील. काही प्रकल्पांचा पुढे उल्लेख केला आहेः

  1. इलेक्ट्रॉनिक डायोड
  2. इलेक्ट्रॉनिक ट्रायोड
  3. टेलिफोन
  4. मायक्रोफोन
  5. लाकूड रंगवण्याचा खास रंग
  6. ऑइल पेंट
  7. सोलर सेल
  8. केसीन पासून डिंक
  9. विजेचा दिवा (Incandescent bulb)
  10. लाकडाचे रक्षण करणारे मेण

विज्ञान केंद्राचे वाचक ही वेबसाइट स्वतः बघतील आणि स्वतःच्या इच्छा व आवडीनुसार त्यातला एक तरी प्रकल्प स्वतः करून पहातील अशी आशा आहे. ही साइट आहे – Simplifier


वरील लेखावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्याकडे जरूर पाठवा. त्यातील निवडक प्रतिक्रियांना या संकेतस्थळावर प्रसिद्धी दिली जाईल. त्यासाठी पुढील इमेल वर आमच्याशी संपर्क साधाः-
vidnyanmail.png


मुख्यपान

Author: प्रसाद मेहेंदळे

Created: 2022-01-04 Tue 17:08