विज्ञान लेखन



विजेचा धक्का

विजेचा धक्का (electric shock)हा अनुभव आपण कधीतरी घेतलेला असतोच. त्या बद्दल मनात भीती देखील असते. योग्य काळजी घेतली तर हा धोका टाळता येतो हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. पण विजेचा धक्का का आणि कसा बसतो या बद्दल माहिती फारच कमी जणांना असते.

धक्क्याचा त्रास का होतो ?

कोणत्याही जोरदार धक्क्याचा त्रास होतोच. मग तो पाठीत मारलेला गुद्दा असेल, एखादी वस्तू अंगावर पडल्याने आलेला अनुभव असेल किंवा विजेचा धक्का असेल. जेव्हा कोणत्याही प्रकारची ऊर्जा आपल्या शरिरात बाहेरून सोडली जाते तेव्हा आपल्याला धक्का बसतो. फलंदाजाच्या शरिरावर गोलंदाजाने टाकलेला चेंडू आदळला, तर चेंडूची गतिज ऊर्जा फलंदाजाच्या शरिरात सोडली जाते आणि त्याला धक्का बसतो. विजेचा धक्का देखील विद्युत ऊर्जा आपल्या शरिरात खर्च होते त्यामुळे बसतो.

electric_shock
Figure 1: विजेचा धक्का

ही ऊर्जा किती आहे त्यावर विजेच्या धक्क्याची तीव्रता अवलंबून असते. शरिरात शिरलेली विद्युत ऊर्जा दोन गोष्टींवर अवलंबून असते.

  • विद्युत विभवांतर (voltage difference):- ज्या ठिकाणी विजेचा शरिराला स्पर्श होतो तेथील व्होल्टेजमधील फरक. वरील आकृतीत जी व्यक्ती दाखवली आहे तिच्या पायापाशी (जमिनीवर) शून्य व्होल्टेज तर डाव्या हातापाशी २३० व्होल्ट आहेत. या व्होल्टेज मधील फरक २३० आहे.
  • शरिराचा विद्युतरोध:- जर शरीर काही कारणामुळे ओले असेल तर विद्युतरोध कमी असतो. शांत मनस्थितीतील व्यक्तीचा विद्युतरोध भीतीग्रस्त व्यक्तीपेक्षा जास्त असतो असे आढळले आहे. माणसाच्या शरिराचा विद्युतरोध सुमारे १ दशलक्ष ओहम असतो. जितका शरिराचा विद्युतरोध जास्त, तितका विजेच्या धक्क्याचा परिणाम कमी. व्यक्तीनुसार विद्युतरोध बदलतो असेही आढळून आले आहे.

गणिती सूत्रे

पुढील गणिती सूत्रे वापरून शरिरात शिरलेल्या विद्युत ऊर्जेचा तपशील काढता येतो.

  • विद्युत शक्ती = व्होल्टेजचा वर्ग / विद्युतरोध = व्होल्टेज x विद्युत प्रवाह
    shock_cedd46b4f0b92ad9a20dd83b9a92109eb6216088.png
  • विद्युत ऊर्जा = (कालावधी * व्होल्टेजचा वर्ग / विद्युतरोध)= कालावधी x विद्युत शक्ती
    shock_a55a43bdfa1eb583eab91b60f633c76d9badfc8b.png

थोडा अधिक तपशील

  • शरिराचा कोणताही भाग विद्युत मंडलाचा (electric circuit) चा घटक बनल्यास त्यातून प्रवाह जातो व धक्का बसतो.
  • सर्वसाधारण माणसाला बसणारा विजेचा धक्का ८० पेक्षा जास्त व्होल्टेज असेल तर जाणवतो.
  • घरगुती विजेच्या व्होल्टेज (२३० व्होल्ट) चा धक्का जोरदार असतो पण प्राणघातक असण्याची शक्यता कमी असते.
  • कारखान्यातील व्होल्टेज (४१५ व्होल्ट) चा धक्का प्राणघातक ठरू शकतो.
  • पायात रबरी, प्लास्टिकची पादत्राणे घातल्यास विजेच्या धक्क्यापासून रक्षण होऊ शकते मात्र त्यावेळी शरीराचे इतर दोन भाग त्यावेळी सर्किट मधे असता कामा नयेत.

विजेच्या धक्क्याचे दुष्परिणाम

  • ज्या ठिकाणी विजेचा स्पर्श शरिराला होतो तेथे भाजते.
  • स्नायूंची नैसर्गिक हालचाल त्यातील पोटॅशियम व सोडियम आयनांच्या प्रवाहामुळे होत असते. विद्युत ऊर्जा शरिरात बाहेरून शिरली तर आयनांच्या प्रवाहात उलथापालथ होते. त्यामुळे अचानक व वेडीवाकडी हालचाल होते.
  • ह्रदयासारख्या स्नायुमय अवयवांच्या कार्यात मोठा बिघाड होऊ शकतो.
  • मोठ्या प्रमाणात विद्युतऊर्जा शरिरात शिरली तर मृत्यू ओढवतो.

विजेच्या धक्क्याबद्दलचे गैरसमज

  • एसी विजेचा धक्का दूर फेकतो, डीसी विजेचा धक्का ओढून घेतो. (असे काहीही होत नाही. केवळ अचानक व वेडीवाकडी हालचाल होते.)
  • पायात चप्पल असेल तर धक्का बसत नाही. (दोन हातात दोन व्होल्टेज बिंदू धरले तर चपलेचा काय उपयोग ?)
  • स्वतःच्या हातात लाकूड घेऊन विजेचा धक्का बसत असलेल्या व्यक्तीला वाचवता येते. (या व्यक्तीला स्पर्श न करता, लाकूड किंवा कोणत्याही इतर विद्युतरोधकाचा वापर करून सर्किटमधून बाहेर ढकलणे किंवा खेचणे आवश्यक आहे. आपण लाकूड डाव्या हातात धरून उजव्या हाताने अशा व्यक्तीला वाचवण्यासाठी स्पर्श करू नये.)

विजेच्या धक्क्याचे उपयोग

  • अगदी कमी व्होल्टेज व कमी ऊर्जेचा उपयोग करून शरिरातील काही व्याधी घालवता येतात. फिजिओथेरपी या वैद्यकीय शाखेत याचा अधिक अभ्यास केला गेला आहे. मात्र मानसिक रोगांच्या बाबतीत असा उपयोग हल्ली केला जात नाही.
मुख्यपान-HOMEPAGE

तुमच्या निवडक प्रतिक्रिया या लेखाच्या खाली प्रसिद्ध केल्या जातील. तुमची प्रतिक्रिया तुम्ही इमेल ने पुढील पत्त्यावर पाठवू शकता. vidnyanmail.png


Author: विज्ञानदूत

Created: 2021-09-26 Sun 16:55