विज्ञान तंत्रज्ञान आणि गणित यांचा सोप्या शब्दांत वेध घेताना, मी विज्ञान-तंत्रज्ञानाचं कौतुक केलं, त्याच्या दोष आणि मर्यांदांचा विचारही केला.
त्याला मानवी चेहरा आणण्यासाठी जो तोल साधायला हवा त्याचा विचार आज मी तुमच्या समोर मांडणार आहे.
सामान्य माणसाला विज्ञान जाणवतं ते त्याच्या सुखसोयींसाठी असणाऱ्या यंत्रांमुळे. ती यंत्र बनवण्यासाठीचं जे तंत्रज्ञान, ते समतोल असेल तर ते मानवजातीच्या हितासाठी काम
करेल. अशा तंत्रज्ञानाला मी सम्यक तंत्रज्ञान म्हणतो. काय आहे हे सम्यक तंत्रज्ञान ?
सम्यक हा शब्द भगवान बुद्धांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी वापरला. त्यांनी सांगितलेल्या आठही धर्ममार्गांमागे विशेषण लावलं आहे सम्यक. सम्यक म्हणजे समतोल साधणारं. तंत्रज्ञान हे लोकांसाठी आहे, लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आहे हे गृहीत धरलं तर तंत्रज्ञानानं आज ताळतंत्र सोडलं आहे हे दिसून येईल. आजारापेक्षा उपाय भयंकर अशी आज तंत्रज्ञानाची स्थिती झाली आहे.
एक उदाहरण घेऊया. आजचं इंटरनेट, मुख्यतः बड्या कंपन्यांना, जगभरात कुठेही कारखाने क्षणात चालू बंद करता यावेत यासाठी महत्वाची भूमिका बजावतं.
कारखाने चालवायचे किंवा नाही हा निर्णय त्या ठिकाणी कंपनीला नफा होतो की नाही या एकाच गोष्टीशी निगडित असतो. लक्षात घ्या की
हा नफा अब्जावधींच्या घरात असतो.
या तुलनेत इंटरनेटवर आपल्याला ज्या काही तथाकथित मोफत सोयी मिळतात त्या म्हणजे कुत्र्यापुढे टाकलेले शिळ्या
पावाचे तुकडे असतात. जेव्हा कारखाना बंद होतो, किंवा यंत्रमानवांची संख्या वाढते, तेव्हा हजारोंनी लोक बेकार होतात, आणि त्यांचं जीवन उध्वस्त
होतं. या गोष्टीचं या कंपन्यांना काहीही घेणंदेणं नसतं.
तंत्रज्ञान जर लोकांसाठी असेल तर ही बेकारी, बेचैनी टळेल.आम्हाला इंटरनेटही हवं आणि बेकारी देखील नको.
संगणक हा मानवी बुद्धिमत्तेचं वाढीव रूप आहे, extension आहे. त्याचा उपयोग केवळ एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी नाही. केवळ व्हिडिओ पहाण्यासाठी नाही. लोकांनी साचवलेली खरी-खोटी माहिती केवळ search करण्यासाठी नाही. कॉपी पेस्ट संस्कृती रुजवण्यासाठी तर नाहीच.
जिथे माणूस कमी पडतो तिथे संगणक मदत करतो. एक उदाहरण पाहूया. किचकट गणितं सोडवण्यासाठी पूर्वी कॅल्क्युलेटर वापरून देखील खूप वेळ लागत असे. ही गणितं आता संगणकाच्या मदतीनं चटकन सोडवता येतात. एखादी गोष्ट प्रत्यक्ष तयार करण्याआधी त्याचं गणिती प्रतिमान वापरून त्या गोष्टीच्या वर्तनाचं अचूक भाकित करता येतं.
माणसानं संवाद किंवा करमणुकीसाठी संगणक वापरू नये असा याचा अर्थ नाही. गप्पाटप्पा, विश्रांती, करमणूक यावर माणसाचा हक्क आहेच. पण हे करत असताना त्याच्या खाजगी माहितीची चोरी होऊ नये. आणि ती माहिती वापरून कंपन्यांनी स्वतःच्या तुमड्या भरू नयेत. यासाठी सम्यक तंत्रज्ञान जागरूक रहातं. तो मार्ग आहे मुक्त संगणकीय प्रणालींचा. या प्रणाली त्यांच्या कार्य करणाऱ्या तर्कमाला सर्वांसाठी खुल्या करतात, त्यामुळे आपण बनवले जात नाही याची आपण खात्री करून घेऊ शकतो.
सध्याचं तंत्रज्ञान ऊर्जेची उधळपट्टी करतं आहे, वस्तूंचा पूर ग्राहकांपर्यंत नेतं आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण होते. आणि निसर्गावर हल्ला होतो आहे. कट्टर पर्यावरणवादी त्यासाठी तंत्रज्ञानच नाकारतात. पण बैलगाडीच्या युगात पुन्हा जायचं नाहीच ही सम्यक भूमिका आहे. सम्यक तंत्रज्ञान हा तोल देखील संभाळतं. प्रगत तंत्रज्ञान नाकारायचं नाही. पण स्वीकारायचं ते आपल्या अटींवर. या अटी, आणि गृहीतकं अशी आहेतः-
आज एखाद्याची प्रगती झाली असं आपण केव्हा म्हणतो ? त्याची आर्थिक स्थिती सुधारली तर. त्यानं पैसा कोणत्या मार्गानं मिळवला हे आपण त्याला विचारत नाही. सम्यक तंत्रज्ञान ज्या समाजरचनेचा एक भाग असेल त्या समाजरचनेत प्रगतीचे मापदंडच वेगळे आहेत. कोणते ते सांगतो...
नव्या समाजरचनेकडे जाण्याची प्रक्रिया देखील सम्यक तंत्रज्ञान फार महत्वाचं मानतं. वाढीचा दर कमी होणं degrowth हे या प्रक्रियेचं एक लक्षण आहे.
आकडेवारी असं सांगते की गेल्या काही दशकांत ऊर्जेचा वापर सातत्यानं वाढतच गेला.
उत्पादित वस्तूंची संख्या देखील सतत वाढती राहिली.
मग त्या वस्तू खपवण्यासाठी खोट्या-नाट्या जाहिराती आल्या. अनैतिक मार्गांचा वापर करून वस्तू ग्राहकांच्या गळ्यात मारल्या गेल्या.
ते करताना या साऱ्याचं मूळ भांडवल जे इंधन तेच खाऊन टाकलं जात होतं.
निसर्गावरचा अन्याय सहन करत आपण काही मोजक्यांची गुलामगिरी केली.
या वाढीचा सतत कमी होणारा दर अंतिमतः शून्य वाढीकडे zero growth जातो आणि थांबतो. या पातळीवर आपण निसर्गाशी सलोखा करतो. आपण त्याचे स्वामी नाही तर त्याचा एक भाग आहोत हे मान्य करतो.शून्य वाढीचा संकल्प जर सिद्धीला न्यायचा असेल तर उत्पादनांवर काही निर्बंध घातले पाहिजेत.
कोणत्याही वस्तू-सेवेचं प्रचंड प्रमाणात उत्पादन शक्य आहे. त्याचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यांचं वितरण कसं करायचं हा एकच प्रश्न शिल्लक आहे. असा समज सर्वसाधारण माणसांमधे प्रसारित केला गेला आहे. कदाचित हे शब्द वापरले गेले नसतील पण तशी वातावरण निर्मिती केली गेली आहे. हे काही प्रमाणात खरं आहे. पण मुळात ज्या पद्धती वापरून हे उत्पादन केलं गेलं, त्या माणसांवर, निसर्गावर अन्याय करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम घातक आहेत. समूहाची long term memory चांगली नसते. तो फक्त आजच्या सुखाचाच विचार करतो. म्हणून आपण हे अर्धसत्य बिनतक्रार स्वीकारलं आहे. यावर उपाय आहेत. पण त्यासाठी काही ध्येयं साध्य करावी लागतील--
हे एक संकल्पचित्र आहे. उद्याच्या सम्यक तंत्रज्ञानानं विकसित झालेल्या जगाचं. ही शब्दांची केवळ आतषबाजी ठरू नये. कारण यातल्या अनेक गोष्टी
आपल्या सर्वांनाच जमणाऱ्या आहेत.
कृतिशून्यतेकडून कृतिशीलतेकडे आपला प्रवास मात्र त्यासाठी सुरू झाला पाहिजे. आत्तापासून...