सत्याचा शोध घ्यायचा असल्यामुळे वैज्ञानिकांना बुद्धिमान असण्याशिवाय पर्याय नसतो. सातत्य, काटेकोर निरीक्षण, प्रामाणिकपणा या गोष्टी नसतील तर वैज्ञानिक होणं शक्यच नसतं. पण वैज्ञानिक ही माणसंच असतात हे लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा, सूडबुद्धी, हेवेदावे हे अवगुणही असतातच. वैज्ञानिक म्हणजे आपल्याला चमत्कारिक वाटणारा आणि आपल्याला न समजणारं असं काहीतरी बोलणारा असाच सोपा गैरसमज सामान्य लोकांनी करून घेतला आहे. वैज्ञानिकांमधे भांडणं-वादही होतात. त्यासाठी ते स्वतःची प्रतिष्ठाही पणाला लावतात. ही परंपरा देखील फार जुनी आहे.
सतराव्या शतकात आयझॅक न्यूटन आणि रॉबर्ट हूक यांच्यातला वाद वैज्ञानिकांमधल्या मानवी संबंधांचा पुरावा देतो. न्यूटन हे त्यांच्या गुरुत्वाकर्षण आणि
गतीचे नियम शोधण्यासाठी प्रसिद्ध आहेत. शिवाय गणितात त्यांनी दिलेलं योगदान हे फार मोठं समजलं जातं.
रॉबर्ट हूक हे वैज्ञानिक न्यूटनचे समकालीन होते. इतकंच नव्हे तर त्यावेळच्या रॉयल सोसायटी ऑफ सायन्स या ब्रिटिश संस्थेचे अध्यक्षही होते.
त्यांनी विविध सिद्धांत मांडले आणि सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोधही लावला. मात्र गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची संकल्पना ही न्यूटन यांनी आपल्या कामावरून
चोरली असा चक्क आरोपच त्यांनी केला. न्यूटन यांनी त्याला उत्तर मात्र चपखल दिलं. या सिद्धांताला गणिताच्या परिभाषेत बसवून गुरुत्वीय
स्थिरांक शोधला तो आपणच हे न्यूटन यांनी सिद्ध केलं.
पुढे हूक यांचं निधन झालं आणि न्यूटन हे रॉयल सोसायटीचे अध्यक्ष झाले. त्यावेळी हूक यांचं
तैलचित्र न्यूटन यांनी नष्ट केल्याचा संशयही व्यक्त केला जातो. आपल्या स्पर्धकांशी अशा सूडबुद्धीने वागून न्यूटन यांनी माणुसपणा दाखवला असं म्हणता
येईल. न्यूटन आणि लिबनिट्झ या गणितज्ञांमधेही कॅल्क्युलसच्या पद्धतींबद्दल असेच वाद होते.
असा दुसरा वाद उफाळून आला तो नोबेल विजेत्या दोन महान वैज्ञानिकांमधे. ते दोघं म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाइन आणि नील्स बोर. दोघेही नोबेल विजेते.
मात्र आइन्स्टाइन यांना क्वांटम मेकॅनिक्सचं अस्तित्व मान्य नव्हतं. नील्स बोर हे क्वांटम मेकॅनिक्सचे एक उद्गाते. जेव्हा वस्तूचा आकार कमी होत होत
अणूभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन इतका लहान होतो तेव्हा गतीचे नेहमीचे नियम त्याला लावता येत नाहीत. इलेक्ट्रॉनचा वेग आणि त्याचं नेमकं स्थान या
दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांगता येत नाहीत, हा आयजेनबर्ग यांनी सांगितलेला अनिश्चिततेचा नियम- uncertainity principle.
मात्र आइन्स्टाइन यांच्या मते हे न सांगता येणं एकतर प्रयोगातील मोजमापांच्या त्रुटीमुळे असतं किंवा एखादं माहिती नसलेलं तत्व यात कार्य करत असतं.
एका विज्ञान विषयक परिसंवादात आइनस्टाइन यांनी एक विधान केलं आणि त्याला नंतर फार प्रसिद्धी मिळाली. God doesn't play dice. देव
फासे टाकून जुगार खेळत नाही. हे ते विधान. फासे टाकल्यानंतर काय दान पडतं त्याचा अभ्यास केवळ सांख्यिकी पद्धतीनंच करता येतो. क्वांटम
मेकॅनिक्समधे संख्याशास्त्रीय पद्धतींना असणारं महत्व आइन्स्टाइनना मान्य नसल्याचं हे विधान सांगतं.
मात्र पुढे संख्याशास्त्रीय पद्धती असणारं क्वांटम मेकॅनिक्स वापरून मोठे शोध लागले. तेव्हा बोर यांचं प्रतिपादन योग्य असल्याचं सिद्ध झालं.
न्यूटन आणि हायजेन्स या शास्त्रज्ञांमधे असाच वाद होता. न्यूटन यांना प्रकाश कणरूप आहे तर हायजेन्स यांना प्रकाश लहरीरूप आहे असं वाटायचं. दोघांनीही प्रयोग करून आपलं म्हणणं मांडलं होतं. त्यानंतर तब्बल सुमारे दीड शतकानंतर आइन्स्टाइन यांनी असं सिद्ध केलं की तो कणरूप असतो. तर क्वांटम मेकॅनिक्सच्या सिद्धांतांप्रमाणे तो कधी कधी कणरूप आणि कधीकधी लहरीरूप असतो हे सिद्ध झालं.
एकोणिसाव्या शतकात शास्त्रज्ञ-उद्योजक असणाऱ्या दोन महान व्यक्तींमधे असाच मोठा वाद निर्माण झाला. तो फार कडवटपणानं लढला गेला. एडिसन आणि टेस्ला या त्या दोन व्यक्ती. एडिसन यांचे बरेचसे शोध डी.सी. विद्युत वापरून लावलेले होते. त्यांना डी.सी विद्युत कमी कार्यक्षम परंतु सोयीची वाटत असे. मात्र त्यांच्याकडेच काम करणाऱ्या टेस्ला यांना ए.सी. विद्युत अधिक परिणामकारक वाटत असे. ए.सी. मोटारी अधिक कार्यक्षम करून दाखवल्या तर मी पन्नास हजार डॉलर्स बक्षिस देईन असं एडिसन यांनी जाहीर केलं. तेव्हा टेस्ला यांनी तशी यंत्रं तयारच करून दाखवली. मात्र एडिसन यांनी बक्षिस तर दिलं नाहीच पण मी ते केवळ विनोदानं म्हटलं होतं असं सांगायला सुरुवात केली. इथे टेस्ला आणि एडिसन यांच्यातल्या वितुष्टाला सुरुवात झाली.
मात्र इथे या वादानं एक वेगळंच वळण घेतलं. एडिसन यांनी ए.सी. प्रवाहाच्या विरोधात प्रचार चालू केला त्यात ए.सी. प्रवाह अपघात घडवू शकतो अशी अफवा पसरवायला सुरुवात केली. ते सिद्ध करण्यासाठी अनेक प्राण्यांना ए.सी. विजेचे धक्के देऊन ठार मारण्यात आलं. मात्र टेस्ला यांनी हार मानली नाही. टेस्ला यांनी नवी कंपनी चालू केली आणि त्यावेळचे मोठे उद्योजक वेस्टिंगहाउस यांनी त्यांना आर्थिक मदत केली. त्यांनी पूर्ण न्यूयॉर्कला ए.सी. विद्युत पुरवठा करण्याचे कामही मिळवलं. इथे मात्र हार मानून एडिसन यांनी आपल्या कारखान्यात चार्ल्स स्टाइनमेट्झ या अत्यंत हुशार विद्युत अभियंत्याला कामावर घेऊन ए.सी. विजेवर चालणाऱ्या उत्पादनांचं संशोधन चालू केलं.
एक वाद गणितात वेगळ्याच पातळीवर निर्माण झाला. तो होता भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन आणि त्यांचे गुरू हार्डी यांच्या दरम्यान.
प्रा. हार्डी यांनी रामानुजन यांना तर्कशुद्ध पद्धतीनं गणिती सिद्धता कशा द्यायच्या याचं शिक्षण दिलं होतं.
रामानुजन यांचं काम विलक्षण आणि मूलगामी आहे हे प्रा. हार्डी यांना मान्य होतं. पण रामानुजन यांना हे सगळं कसं सुचतं हे त्यांना लक्षात येत नसे.
हे तुला कसं सुचतं असा प्रश्न रामानुजन यांना विचारल्यावर त्यांचं उत्तर होतंः देवी मला हे सगळं सांगते. या वर तर्ककठोर प्राध्यापक हार्डी विश्वास
कसा ठेवणार ? रामानुजन यांना क्षयाची बाधा झाल्यानं भारतात परतावं लागलं.
१९१८ साली रामानुजन यांना इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचं मानद सदस्यत्व मिळालं. ते मिळावं यासाठी प्राध्यापक हार्डींनी जे भाषण केलं होतं. त्यात वेगळेच मुद्दे त्यांनी मांडले होते. देवी रामानुजन यांना सिद्धांत सांगते ते आपल्याला योग्य वाटत नाही असं ते म्हणाले. कारण देवीचं अस्तित्व हे एक सिद्धता नसलेलं गृहीतक आहे. पण अशी सिद्धता नसलेली गृहीतकं गणितात आहेत असं हार्डींना वाटतं. पाय हा स्थिरांक आधीच अस्तित्वात होता आपण केवळ त्याचं बिनचूक मूल्य शोधत राहिलो. ज्यांना इनव्हेन्शन आणि डिस्कव्हरी यातला फरक माहिती आहे त्यांना हे समजेल, पटेल. जे अस्तित्वात आहे पण आपल्याला माहिती नाही अशा गोष्टी जर आपण स्वीकारतो तर त्याच्या मूळ अस्तित्वाला रामानुजन देवी म्हणतात यात फारसं चूकीचं नाही असा मुद्दा त्यांनी मांडला.
आयुष्याच्या शेवटी शेवटी मात्र रामानुजन यांनी आपला विचार बदलून देवी आपल्याला हे सांगते असं आता आपल्याला वाटत नसल्याचं कबूल केलं आहे.
आता आपण हयात असलेल्या दोन व्यक्तींमधला वाद ऐकणार आहोत. त्यातले एक आहेत बिल गेट्स आणि दुसरे आहेत मुक्त संगणकीय प्रणालींचे
अध्वर्यू रिचर्ड मॅथ्यू स्टॉलमन.
प्रत्येक संगणकीय प्रणाली मुक्त असायलाच हवी असा आग्रह धरणारे रिचर्ड स्टॉलमन यांनी १९८० च्या दशकात त्यांची चळवळ चालू केली. त्यावेळी
गेट्स यांची कंपनी तुलनेनं लहान होती.
आम्ही सॉफ्टवेअर लिहितो आणि त्याचे पैसे घेतो. आमच्या कष्टांचा मोबदला आम्हाला मिळालाच पाहिजे. असा सूर गेट्स यांनी त्याकाळी संगणक तज्ञांना खुले पत्र लिहून लावला होता. आम्ही जे काम करतो ते इतरांना खुलं केलं तर त्याचा मोबदला आम्हाला कसा मिळणार असं गेट्स यांचं म्हणणं होतं.गेट्स यांच्या कंपनीला कामाचा मोबदला अनेक पटींनी मिळाला हे सर्वांनाच माहिती आहे.
एकविसाव्या शतकात सामान्य माणसाच्या आयुष्यात संगणकाला फार महत्वाचं स्थान निर्माण झालं. त्याचे दैनंदिन व्यवहार संगणकाच्या मदतीनं होऊ लागले. अशा वेळी स्टॉलमन यांनी मांडलेला नैतिकतेचा मुद्दा महत्वाचा ठरतो. माणसाच्या मेंदूचं एक्सटेन्शन म्हणून काम करणारी ही कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्या हिताचेच व्यवहार करते आहे ना हे तपासायचं असेल तर प्रत्येक संगणकीय प्रणाली खुलीच असायला हवी हे समजून घेतलं पाहिजे.
मी शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांमधले हे वाद तुमच्यासमोर मांडले ते वेगळ्याच कारणानं. मुळात वाद-भांडणं वाईट असतात असं जर आपल्याला वाटत असेल तर ती गोष्ट थोर लोक करतातच हे आपल्याला समजायला पाहिजे. पण मुळात वाद घालणं वाईट आहे असं नाही. गुराख्यामागे जाणारी, न भांडणारी मेंढरं शेवटी कत्तलखान्यात जातात हे आपल्याला ठाऊक नाही का ? पण सामान्य माणसातल्या वादांत आणि मगाशी सांगितलेल्या वादविवादात एक महत्वाचा फरक आहे.
न्यूटन-हायजेन-हूक यांच्यातले वाद हे निसर्गाचे नियम कोणी शोधले आणि ते नियम नेमके काय आहेत याचा मागोवा घेतात. बिनचूक नियम शोधणाऱ्या विज्ञानाला अनिश्चिततेची मर्यादा असू शकते असं बोर आइनस्टाइन यांच्यातला वाद सुचवतो. एडिसन आणि टेस्ला यांच्यातला वाद पूर्णपणे तांत्रिक असून देखील त्यात माणसं स्वार्थ-प्रतिष्ठा यांमुळे कडवटपणा आणतात हे दाखवतो. हार्डी आणि रामानुजन यांच्यातला मतभेद गणिताला एका अध्यात्मिक पातळीवर घेऊन जातो. गेट्स-स्टॉलमन यांच्यातला वाद आपल्या आजच्या आणि उद्याच्या स्वातंत्र्याशी निगडित आहे.ही माणसं जितकी मोठी आहेत तितके त्यांचे वादही मोठे आहेत. आपणही वाद घालायला हरकत नाही. पण त्या वादांचे विषय सत्याच्या शोधाशी संबंधित असले म्हणजे झालं.