सायकल आणि पर्यावरण

सायकल चालक हा पर्यावरणाचे रक्षण करतो अशी आजवरची आपली समजूत होती. सुदैवाने ती आज देखील खरी आहे. पण हे फार दिवस खरे ठरेल असे नाही. नव्या सायकलींचे (प्रचंड प्रमाणात) उत्पादन ज्या प्रकारे होते आहे, त्या प्रकारे उत्पादन व विक्री होत असतानाच या सायकली पर्यावरणावर आघात करीत आहेत हे लक्षात येते.

सायकलस्वारी

मी गेली २५ वर्षे जवळपास (५ ते ७ कि.मी) जाण्यासाठी सायकलच वापरतो. गेले काही दिवस माझ्या असे लक्षात आले की लहान मुले (१४ वर्षांच्या आतील) सायकल मोठ्या प्रमाणावर वापरू लागली आहेत. त्यांच्या शालेय पुस्तकात पर्यावरणाविषयी असलेल्या धड्यांचा हा परिणाम असू शकेल. वयाच्या १४ वर्षांनंतर नंतर मात्र हे सायकल “प्रेम” आटू लागते असे दिसते. तरुणाईला वेगाची ओढ असते असे जाहिरातीतून ठसवले जाते त्याचा हा परिणाम असावा. गृहरचना संस्थांच्या पार्किंग जागेत गंजत पडलेल्या सायकली पाहिल्या की या “प्रेमभंगा”चा पुरावा आपल्याला मिळतो.

सायकल पर्यावरणपूरक आहे ?

या लेखात सायकल वापरणे पर्यावरणपूरक आहे हे गृहीत धरले आहे. पण ज्या प्रकारे सध्या सायकलींचे उत्पादन केले जाते त्यामुळे पूर्वीच्या मानाने ते पर्यावरणपूरक ठरत नाही हा विचार मांडला आहे. अनेक मुद्द्यांचा विचार करताना कपचि (कर्ब पद चिन्ह-Carbon Foot Print) या संकल्पनेचा वापर केला आहे. म्हणून प्रथम “कपचि” म्हणजे काय हे पाहू.

कर्ब पद चिन्ह

एनसायक्लोपिडिया ब्रिटानिकात उल्लेख केल्या प्रमाणे
"कर्बपदचिन्ह म्हणजे, एक किंवा अनेक व्यक्तींशी, इतर वस्तूंशी वा संस्थांशी (उदा. देश, कारखाना इत्यादी) निगडित असलेल्या कार्बन डाय ऑक्साइडचे वजन".

या व्याख्येत कार्बन डाय ऑक्साइडला महत्व आहे. कोणतेही कार्य, उत्पादन करताना ऊर्जा वापरली जाते. ही ऊर्जा मुख्यतः भूगर्भातील तेल, कोळसा इत्यादी इंधने जाळूनच निर्माण करण्यात येते. जाळण्याचा परिणाम कार्बन डाय ऑक्साइड तयार होण्यात होतो. पर्यावरण दूषित करण्यात या वायूचा मोठा वाटा आहे. म्हणून संस्था, वस्तू वा व्यक्तीने निर्माण केलेला कार्बन डाय ऑक्साइड मोजला, की त्या वस्तू, व्यक्ती किंवा संस्थेचा प्रदूषणातला वाटा किती हे ठरवता येते. कार्बन डाय ऑक्साइड सोबतच मिथेन, सल्फर डाय ऑक्साइ़ड या सारखे वायूही प्रदूषण करतात पण मोठा वाटा कार्बन डाय ऑक्साइडचा असतो म्हणून कपचि मोजताना कार्बन डाय ऑक्साइडच्या विचार प्रामुख्याने केला जातो.

सायकलचा कपचि

आता सायकली तयार करण्याचा कपचि (कर्ब पद चिन्ह) किती हे पाहूया. १९८० साला आधी सायकली साधारणपणे लोखंडी असायच्या. मुख्यतः त्यांची फ्रेम व चाके लोखंडी असत. आता मात्र ती ऍल्युमिनियमची असतात. काही सायकलींच्या फ्रेम्स व सुटे भाग कार्बन धाग्यांच्या मिश्रधातूंपासून, टिटॅनियम व स्टेनलेस स्टील पासून बनतात. लोखंडी भागांपासून बनवलेल्या सुट्या भागांच्या तुलनेत, ऍल्युमिनियम व इतर धातू यांचा कपचि खूपच जास्त असतो. म्हणजेच, या धातूंपासून बनलेली सायकल उत्पादित होताना अधिक इंधन जाळून अधिक प्रदूषण करते.

संदर्भः(https://dukespace.lib.duke.edu/dspace/bitstream/handle/10161/8483/D uke_MP_Published.pdf) वरील उदाहरणांत आपण या प्रकारच्या सायकली बनण्यास किती पैसा खर्च झाला हे न बघता, त्यांनी किती प्रदूषण केले हे पहात आहोत हे लक्षात घ्या.

हल्लीच्या सायकलचा कपचि कशाने वाढतो ?

कालच्या सायकलींच्या मानाने हल्लीची सायकल बनताना जास्त प्रदूषण होते. त्याची अनेक कारणे सांगता येतात. त्यापैकी महत्वाच्या कारणांचा पुढे उल्लेख करीत आहे.

  1. ऍल्युमिनियमची फ्रेम वापरणे: ऍल्युमिनियम फ्रेम वापरल्यामुळे सायकलचे वजन कमी होते हे खरे आहे. पण मुळातच सायकल ही जवळपास जाण्यासाठी उपयुक्त असते.
  2. प्रचंड उत्पादन, यांत्रिक जुळणी: सायकलीची चाके अक्षाभोवती नीट फिरवणे (trueing), चाकांचे स्पोक्स ताणून घेणे, सायकलची सीट बनवणे ही कामे, हातांनी केली जात असत. आता ही कामे व त्याशिवाय सायकलची पूर्ण असेंब्ली यंत्रांद्वारे केली जाते. म्हणजे त्या यंत्रांनी वापरलेला कपचि सायकलच्या कपचि मधे वाढ करतो.
आज किती होत असेल सायकलींचे उत्पादन ? गेल्या दोन दशकांत उत्पादित झालेल्या ११ कोटी सायकलींपैकी ६६ टक्के सायकली चीनमधे तयार केल्या गेल्या. चीनमधील सर्वात मोठी उत्पादक कंपनी रोज ५५००० सायकलींचे उत्पादन करते. ही संख्या अमेरिकेत एका वर्षात बनणाऱ्या सायकलींपेक्षा थोडीशीच कमी आहे ! अशा रीतीने प्रचंड प्रमाणात आणि यांत्रिक (अमानवी) पद्धतीने झालेले सायकलींचे उत्पादन हे देखील सायकलचा कपचि वाढवायला जबाबदार ठरते आहे.
संदर्भः (https://www.routledge.com/Routledge-Companion-to-Cycling/Norcliffe- Brogan-Cox-Gao-Hadland-Hanlon-Jones-Oddy-Vivanco/p/book/9781003142041)

अल्पायुषी सायकली

हल्लीची ही सायकल दीर्घायुषी तरी असते का ? त्याचे उत्तरही " नाही ! " असे द्यावे लागते. हल्लीची सायकल दीर्घायु ठरत नाही. त्याची अनेक कारणे आहेत. ती पहाण्याआधी तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी विकत घेतलेली सायकल किती वर्षं वापरली हे आठवून पहा. प्रश्नाचे उत्तर ५० वर्षे किंवा त्याहून अधिक असे येऊ शकेल. या दीर्घायुषी सायकलींचे रहस्य काय होते ?

विद्युत सायकली

प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की विद्युत सायकलींचे आयुष्य मानवी शक्तीवर चालणाऱ्या सायकलीपेक्षा कमी असते. त्यात असणाऱ्या बॅटरी, मोटार इतर कंपन्यांच्या सायकलला बसत नाहीत. त्यामुळे त्यांची सहज दुरुस्ती शक्य होत नाही. त्याचा परिणाम म्हणून या सायकली लौकर बाद होतात. नव्या घ्याव्या लागतात. या सायकलींसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटऱ्या देखील पुन्हा दुरुस्त करून वापरण्यायोग्य नसतात. अशा नव्या बॅटऱ्यांची किंमतही खूप असते. मुळात बॅटरी व मोटार या जादा भागांमुळे विद्युत सायकलींचा कपचि बराच जास्त असतो. शिवाय बॅटरी रीचार्ज करायलाही वीज लागते आणि कपचि वाढतच जातो. बॅटरी आणि मोटारमुळे दर १५००० किलोमिटर साठी हा कपचि ४२ किलोग्रॅमने वाढतो असे लक्षात आले आहे.

सामुदायिक सायकली

गेल्या काही वर्षात, जगात आणि भारतातही (पुण्यात सुद्धा) सायकली सामुदायिक रित्या वापरण्याचे प्रयत्न होत आहेत. खरे तर सामुदायिक वापरामुळे कमी सायकली तयार होऊन त्यामुळे होणारा कपचि सुधारायला हवा. पण तसे होत नाही. कारण असे लक्षात आले आहे की ,

कारशी तुलना

सायकल कितीही जास्त कपचि निर्माण करणारी असली तरी कारच्या तुलनेत ती चांगलीच ठरते. कारण लहान कार उत्पादित करताना ६ टन CO2 निर्माण होतो. तर मोठी कार उत्पादित करताना ३५ टन. म्हणजे कारच्या तुलनेत विजेची मोटार असणारी सायकलही कमी कपचि असणारे वाहन ठरते. पण कोणतीच सायकल ही कारच्या ऐवजी दर वेळी वापरता येईल असे नाही. त्यामुळे निदान कमी अंतरांसाठी प्राधान्याने पायाने चालवण्याची लोखंडी फ्रेमवाली सायकल चालवणे महत्वाचे.

उपाय

सायकल कशीही असली तरी कारपेक्षा (कमी अंतरासाठी) पर्यावरणपूरक हे मान्य केले तरी तिचा कपचि आणखी कमी करण्याचे उपायही आहेत.

आपण काय करू शकतो ?

वर लिहिलेले विविध उपाय वापरणाऱ्याच्या हातात नाहीत. इथल्या सायकल दुरुस्ती दुकानदारांशी बोलल्यावर मला काही उपाय सुचतात ते पुढे नोंदवत आहे.

आता आणखी एका कळीच्या प्रश्नाला हात घालतो. अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, इयत्ता दहावीत जाणे हे सायकल सोडून इंधन वाहन वापरण्याचे वय असे अनधिकृतरित्या जाहीर झाले आहे. आपल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी त्यांना इंधन वाहन देणे हे पालकांसाठी जणु सक्तीचे ठरते आहे. झुंडीचे मानसशास्त्र वापरून आपल्या माथी बड्या कंपन्या त्यांना फायद्याच्या ठरणाऱ्या गोष्टी मारत आहेत. अशी खरेदी करणे हा पालकांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला गेला आहे.

पालकही स्वतः सायकल वापरण्याऐवजी जर शेजारच्या दुकानात जाण्यासाठी देखील इंधन वाहनच वापरत असतील, तर मुलांनी नेहमी सायकल वापरावी ही अपेक्षा गैर ठरणारच. इतर अनेक बाबतीत पाश्चात्त्यांचे अनुकरण करणारे भारतीय या बाबतीत मात्र “स्वतंत्र विचार” का अमलात आणतात हे एक कोडेच आहे.

सायकल मुळे होणारा व्यायाम, फेरफटक्याचा आनंद, प्रदूषणात घट, कमी अंतरासाठीच्या प्रवासासाठी खर्चात बचत आणि काही प्रमाणात वेळेची बचत हे सायकलचे फायदे आपल्याला माहिती आहेत. सायकलला प्रतिष्ठा मिळण्यासाठी विद्वान आणि धनवान सायकलचा वापर अधिकाधिक करतील तर त्यांचे अनुकरण इतर करतील. रस्त्यावरची धूळ, धूर, गोंगाट, कमी होईल आणि आरोग्यातही वाढ होईल.


या लेखावर प्रतिक्रिया देण्यासाठी आम्हाला पुढील पत्त्यावर इ-मेल लिहा.
vidnyanmail

काही प्रतिक्रिया:

ABHIJIT SURYAVANSHI म्हणतातः

September 22, 2023 at 10:06 am
The artical is very informative,elaborative.

Benefits of using cycle,modern cycles,electric cycle, co2 emission due to manufacturing and environment effects all these points are really interesting and vital that one must(humans) look after as part of environment .

I am strongly agree with Mr. Uday Athlay sir, he has mentioned exact mentality of people around us. I think one should start using cycle as long as possible ,make cycle as a part of lifestyle, take health benefits & contribute to environment as well.

Avinash Dandekar म्हणतातः

August 4, 2023 at 8:58 pm

सायकल स्वारी मुळे मानसिक आरोग्य देखील सुधारते.
पार्किंग ची गरज नाही.वाहतूक कोंडी होत नाही.रस्ते खराब होत नाहीत.देखभाल खर्च अगदी नगण्य.ध्वनी प्रदुषण नाही.
वरील सायकल स्वारी चे फायदे आहेत.
सायकल आपली उंची पाहून खरेदी करावी.

Uday Oak says:

July 30, 2023 at 10:30 am

वस्तू तयार करतानाचे कर्बपदचिन्ह हा मुद्दा महत्वाचा आहेच. त्याबरोबर ती वस्तू वापरताना पर्यावरणावर होणारा परिणाम हाही लक्षात घ्यावा लागेल. कुठल्याही व्यवसायात स्थिर खर्च आणि आवर्ती खर्च हे जसे पाहतो तसे. अगदी जवळच्या अंतरावर जाण्यासाठीही स्वयंचलित दुचाकी वापरण्याने पर्यावरणावरती कितपत प्रभाव पडतो ते जरा आकडेवारी मांडून पाहू.

अगदी रमतगमत, अजिबात जिवास तोशीस न लावता १ किलोमीटर सायकल चालवण्यासाठी आपण जास्तीत जास्त सुमारे ५० कॅलरीज खर्चतो.

आता लिटरला सुमारे ६५ किमी जाणाऱ्या दुचाकीकडे पाहू. एक किलोमीटर अंतर कापायला त्या दुचाकीला सुमारे १५ मिली पेट्रोल लागते. पेट्रोलची घनता साधारण ०.७५ असते, म्हणजे ११.२५ ग्रॅम. एक किलो पेट्रोलमधून १,११,१०,००० कॅलरीज मिळतात. म्हणजे १ ग्रॅममधून ११,११०, आणि ११.२५ ग्रॅममधून १,२७,९८७.५.

म्हणजे, स्वतःच्या ५० कॅलरीज खर्चण्या ऐवजी आपण पेट्रोलच्या सव्वा लाख कॅलरीज खर्चतो. सायकल चालवण्याच्या पाच-सात मिनिटांमध्ये आपण सुमारे ५ ग्रॅम कार्बन डायॉक्साईड उत्सर्जित करतो.१५ मिली पेट्रोलच्या ज्वलनामधून सुमारे २९.६१ ग्रॅम कार्बन डायॉक्साईड उत्सर्जित होतो. म्हणजे, रमतगमत सायकल चालवण्या ऐवजी पेट्रोल वापरून आपण पाचपटीहून जास्त कार्बन डायॉक्साईड उत्सर्जित करतो.

अशी आकड्यांतली मांडणी शालेय मुलांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करून पहायला हवा. तसेच, कर्बपदचिन्ह ही संकल्पना इतरही बाबतीत तपासून पहायला हवी. इथे ‘पहायला हवी’ म्हणण्यामागे समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन हे करायला हवे असे म्हणण्याचा उद्देश आहे. ‘कुणीतरी करायला हवे’ असा खुर्ची-पांडित्य न्याय नाही!

उदाहरणार्थ, प्लास्टिक बाटल्यांबद्दल बरेच वाईटवंगाळ बोलले/लिहिले जाते. प्लास्टिकबंदीची मागणी हिरीरीने मांडणे म्हणजेच पर्यावरणप्रेम असेही सिद्ध होऊ लागले आहे. तर एक प्लास्टिकची बाटली किती वेळेस वापरता येते याचे शास्त्रीय उत्तर – काही हजार वेळेस, म्हणजेच, धातूची/काचेची बाटली जितक्या वेळेस पुनःपुन्हा वापरता येते तितक्या वेळेस – आधी मांडावे. मग एक प्लाटिकची बाटली तयार करताना निर्माण होणारे कर्बपदचिन्ह आणि एक धातूची/काचेची बाटली निर्माण करताना होणारे कर्बपदचिन्ह याची तुलना. यात धातू निर्माण करण्यासाठी करावे लागणारे खनिज उत्खनन आणि वाहतूक यांचाही अंतर्भाव हवा. केवळ उत्पादनप्रक्रियेचे कर्बपदचिन्ह नको. मग हे आकडे समोर मांडून प्लास्टिक / धातू / काच बाटली यांच्या वापराचा तौलनिक तक्ता मांडता येईल.

शेवटी, सायकलने सुरू झालेले हे चक्र फिरते ठेवले तर निश्चितच काही अंतर कापता येईल!

vidnyandoot म्हणतातः

July 30, 2023 at 11:36 am

धन्यवाद Uday Oak

” म्हणजे, रमतगमत सायकल चालवण्या ऐवजी पेट्रोल वापरून आपण पाचपटीहून जास्त कार्बन डायॉक्साईड उत्सर्जित करतो.”

हा फारच महत्वाचा मुद्दा आहे. सायकल किती वेगवेगळ्या प्रकारानं पर्यावरणरक्षण करते याचं हे उत्तम उदाहरण ठरेल. प्लास्टिकचे पुनर्चक्रीकरण, त्याचे कर्बपदचिन्ह हा एक वेगळाच विषय आहे. त्यावर एक स्वतंत्र निबंध होऊ शकेल.

उदय भरत आठल्ये म्हणतातः

July 23, 2023 at 6:48 pm

सर्वप्रथम सखोल, विस्तृत आणि चिंतनीय विषयाने आपल्या उपक्रमाची सुरुवात केल्या बद्दल मी तुझे आभार मानतो.

बहुसंख्य भारतीयांची मानसिकता लक्षात घेता असे निदर्शनास आले की जुन्या प्रकारची सायकल विकत घेणे, वापरणे हा कुचेष्टेचा विषय होत आहे. श्रीमंतीच्या, मोेठेपणाच्या भ्रामक समजुतीत हा समाज मश्गूल आहे. झपाट्याने होत असलेला पर्यावरण-ऱ्हास, नैसर्गिक हवामानातील बदल याविषयी बहुसंख्य लोक उदासीन आहेत. सबब कर्बपदचिन्ह वगैरे त्यांच्या वैचारिक कुवतीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत.

असे असतानाही समाज प्रबोधनाची धडपड केलीच पाहिजे हे मात्र मान्य करावे लागेल. विविध लोकांशी बोलणे केल्यावर असे लक्षात आले की सध्या तयार होणाऱ्या सायकली या छोटे मोठे सामान आणण्यास उपयुक्त नाहीत. म्हणून किराणा वगैरे आणण्यासाठी स्कूटर वगैरेच वापरावी लागते. या म्हणण्यात मला तथ्य आढळले. अर्थात जुन्या प्रकारच्या सायकली हा याला पर्याय आहे, पण ती कोणाची मानसिकता नाही.

तरुणाईला आपल्या उत्पादनांची चटक लावणे हा सध्या भांडवलशाही कारखानदारीचा महत्वाचा उद्देश आहे. चित्ताकर्षक उत्पादन तयार करणे, त्याची मनोवेधक जाहीरात करणे हा त्यांचाा यशाचा मूलमंत्र आहे. या कारखानदारीला कपचि शी काही घेणे देणे नाही, ग्राहकालाही नाही. यास्तव होणारी हानी अटळ आहे.

तुझ्या लेखात जुन्या सायकली दुरुस्त करून वापरण्याची कल्पना तू मांडली आहेस, पण दुर्दैवाने अशी मानसिकता आता कमी आढळते. वापरा आणि फेका ही संस्कृती बोकाळली आहे. Durable- टिकाऊ हा शब्दच बाजारात ऐकू येत नाही. खूप वर्षे वस्तू टिकल्या तर आमचा धंदा वाढेल कसा ? असे कोडगे समर्थनही केले जाते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येकाने योग्य निर्णय घ्यायचे आहेत.

vidnyandoot म्हणतातः

July 27, 2023 at 1:37 pm

खडकावर पाण्याची धार धरली तर तोही भंगतो म्हणतात. मी आशा बाळगून आहे.


मुख्यपान-HOMEPAGE
लेखकः विज्ञानदूत, तारीखः July 22, 2023