काही दिवसांपूर्वी माझे मित्र विज्ञानदूत यांनी श्री. रविंद्र बोटवे लिखित “माय माती” हे पुस्तक भेट दिले. पुस्तक वाचल्यानंतर माझी मते संक्षिप्त स्वरूपात नमूद करीत आहे.
हे पुस्तक शेतकरी बंधूंनी, शेती विषयी आस्था असलेल्या व्यक्तींनी वाचनीय आहे. अतिशय सोप्या भाषेत, कुठलेही पाल्हाळ न लावता माती विषयी सखोल माहिती लेखकाने पुरवली आहे. अनुक्रमणिकेतूनच मातीविषयाच्या सुसंगत लेखनरचनेचा अंदाज येतो. प्रत्येक प्रकरणात विषयाची आस्था, कळकळ जाणवते.
माती म्हणजे काय ? इथून सुरुवात करून मातीचा रंग, पोत, त्यातील घटवगैरे बऱ्याच गोष्टींचा परामर्श घेण्यात लेखक यशस्वी झाला आहे असे माझे मत आहे. परंतु शिक्षणाचा अभाव, जिज्ञासा नसणे, शेती विषयक कामे व इतर सांसारिक समस्येमुळे किती शेतकरी हे पुस्तक वाचतील या विषयी मला शंका आहे. शेतीविषयक सामग्री पुरवणाऱ्या कंपन्या, व्यापारी हे शेतकऱ्यांना स्वतःला फायदेशीर माहिती पुरवतात व बहुसंख्य शेतकरी त्यांच्या बोलण्याला, आमिषाला बळी पडत असावेत असे मला वाटते. अर्थात लेखकाने पुस्तकात बऱ्याच वेळा याचा उल्लेख केला आहेच.
मी शेतकरी नाही, पण एक शेतीप्रेमी म्हणून सुद्धा मला “माय माती” हे पुस्तक खूप आवडले. माझे माती विषयी ज्ञान वाढले असेही म्हणता येईल. शक्य तितक्या शेतकऱ्यांना भेटून सदर पुस्तक वाचायला द्यायला मी प्रयत्नशील राहीन.
चांगले पुस्तक लिहिल्या बद्दल श्री. रविंद्र बोटवे यांचे अभिनंदन.
हे पुस्तक शेतकरी, शेतीप्रेमी यांनी जरूर विकत घेऊन वाचावे, वाटावे. ते विकत घेण्यासाठी लेखकाशी या इमेल पत्त्यावर संपर्क करता येईल –